
माहूर प्रतिनिधी – रुपेश मोरे
यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे माहुर तालुक्यात कोरड्या दुष्काळाचे सावट अधिकच गडद झाले आहे.पाऊस न पडल्याने हाताशी आलेली पिके डोळ्यांदेखत जळून खाक झाली असून, बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर, वाई बाजार येथील शेती पिकांच्या झालेल्या गंभीर नुकसानीची थेट शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करण्यात आली व प्रशासनाकडून संयुक्त पंचनामा करण्यात आला.कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान अतोनात आहे. या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत उपविभागीय अधिकारी बि. सर्वनन आणि तहसीलदार अभिजित जगताप यांच्या मुख्य उपस्थितीत वाई बाजार परिसरातील बाधित शेतांची पाहणी झाली.

या पाहणी दौऱ्यात वाई सज्जाचे तलाठी राम ठाकरे , कृषी सहाय्यक अजय सावळे, मंडळ अधिकारी योगिता राठोड आणि पोलीस पाटील सौ आशा बळीराम मोरे हे देखील प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित होते.महसूल आणि कृषी विभागाच्या या संयुक्त पथकाने वाई बाजार येथील वाळलेल्या पिकांची पाहणी केली.कापूस,सोयाबीन पिकांचे पाण्याअभावी अतोनात नुकसान झाले असून, विहिरी आणि कूपनलिकांनीही तळ गाठला आहे. शेतकऱ्यांनी घेतलेले कष्ट आणि लावलेला भांडवली खर्च वाया गेल्याचे चित्र शेतावर दिसून आले.पाहणीदरम्यान स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर आपल्या व्यथा मांडल्या. “पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे पिके तर जळालीच, पण आता जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने लवकरात लवकर आर्थिक मदत आणि दुष्काळग्रस्त सवलती जाहीर कराव्यात,” अशी आर्त साद बाधित शेतकऱ्यांनी घातली.उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी उपस्थित तलाठी व कृषी सहाय्यकांना कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊन त्वरित आणि वस्तुनिष्ठ पंचनामे पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिले. सर्व नुकसानीचा एकत्रित अहवाल तयार करून तो तातडीने राज्य शासनाकडे भरपाईसाठी पाठवला जाईल, असे आश्वासन यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिले.या पाहणी दौऱ्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, आता शासन स्तरावरून लवकरात लवकर कोरडा दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत कधी मिळणार, याकडे संपूर्ण वाई येथील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.














Leave a Reply