सत्यशोधक Live न्यूज

माहिती ,सत्य,बातमीदारी

माहूर तालुक्यात गटविकास अधिकाऱ्यांचा कडक पवित्रा! ७ ग्रामपंचायतींना ‘स्मरण पत्र’; ५ वर्षांच्या विकासकामांची दप्तर तपासणी सुरू

माहुर प्रतिनिधी :-

माहूर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये मागील ५ वर्षांत झालेल्या विकासकामांच्या निधी वापराबाबत प्रशासकीय पातळीवर मोठी हालचाल सुरू झाली आहे. नागरिकांच्या तक्रारी आणि लोकप्रतिनिधींच्या पत्रानंतर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (वर्ग-१) यांनी संबंधित ग्रामपंचायतींना अत्यंत महत्त्वाचे ‘स्मरण पत्र’ जारी करून कामांचे संपूर्ण दप्तर तातडीने सादर करण्याचे सक्त आदेश दिले आहेत.

​हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी माहूर तालुक्यातील गोंडवडसा, अंजनखेड, सेलु, करंजी, शेकापूर, सिंदखेड, पारडी आणि हरडप या ग्रामपंचायतींमध्ये १५ वा वित्त आयोग, जल जीवन मिशन, मनरेगा आणि जनसुविधा योजना अंतर्गत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी प्रशासनाकडे लावून धरली होती. या कामांमध्ये आर्थिक गैरवापर व अनियमितता झाल्याच्या नागरिकांच्या तक्रारींचा संदर्भ खासदारांच्या पत्रात देण्यात आला होता. ​

या संपूर्ण प्रकरणातील तांत्रिक बाबींच्या अचूकतेसाठी गौरव संजय राठोड यांच्यामार्फत प्रशासकीय पातळीवर आवश्यक पाठपुरावा केला जात आहे. शासकीय पोर्टलवरील नोंदी, कामांचे जिओ-टॅगिंग आणि प्रत्यक्ष जमिनीवरील वस्तुस्थिती यांचा तुलनात्मक अभ्यास करून सामान्य नागरिकांच्या कराचा पैसा योग्य कामासाठीच खर्च झाला आहे का, याची कागदपत्रांच्या आधारे निष्पक्ष तपासणी केली जात आहे. ​दप्तर लपवल्यास कारवाईचा इशारापंचायत समिती, माहूर कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रानुसार (जा.क्र.पंसमा/पंचायत-२/१७४६/२०२६), मागील ५ वर्षांत मंजूर झालेल्या सर्व कामांची माहिती, अंदाजपत्रक, करार पत्रक, मोजमाप पुस्तिका व देयकांचा तपशील तात्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश पूर्वीच देण्यात आले होते.

मात्र, मुदतीत माहिती उपलब्ध करून न दिल्याने गटविकास अधिकाऱ्यांनी स्मरण पत्र जारी करत सर्व माहिती तात्काळ सादर करण्याचे निर्देश दिले असून माहिती सादर करण्यास विलंब होणार नाही याची गांभीर्याने दक्षता घेण्याची सूचना केली आहे. ​प्रत्यक्ष जमिनीवर झालेली विकासकामे आणि कागदोपत्री झालेल्या खर्चाचा ताळमेळ तपासल्यानंतरच नेमकी वस्तुस्थिती समोर येणार असल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष या प्रशासकीय चौकशीकडे लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *