माहुर प्रतिनिधी :- रुपेश मोरे
अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम हातातून गेल्यानंतर आता राज्याच्या रब्बी हंगामावरही दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने आणि विहिरी, बोअरवेल तसेच प्रकल्पांमधील पाणीसाठा झपाट्याने घटल्याने गहू आणि हरभऱ्यासारखी प्रमुख रब्बी पिके संकटात सापडली आहेत. दुहेरी आर्थिक संकटात सापडलेला राज्यातील बळीराजा सध्या अक्षरशः बेहाल झाला आहे.
यंदा पावसाने दिलेली ओढ आणि पाणीटंचाई यामुळे रब्बी हंगामातील पेरण्यांचा वेग मंदावला आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात रब्बीच्या पेरणीचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या पिछाडीवर आहे. ज्या शेतकऱ्यांनी उसनवारी करून हरभरा व गव्हाची पेरणी केली आहे, त्यांची पिके आता पाण्याअभावी सुकू लागली आहेत. सिंचनाची सोय नसलेल्या भागात अनेकांनी शेती पडीक ठेवणेच पसंत केले आहे.
खरीप हंगामात सोयाबीन, कापूस आणि मका पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित आधीच कोलमडले होते. रब्बी हंगामातून काहीतरी हाती लागेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, बियाणे, खते, मशागत आणि मजुरीवर केलेला खर्चही निघण्याची शक्यता धुसर झाली आहे. बँकांचे कर्ज आणि खासगी सावकारांचे देणे कसे फेडायचे, या विवंचनेत शेतकरी कुटुंबे सापडली आहेत.
रब्बी हंगामातील गहू आणि हरभऱ्याचे उत्पादन घटल्यास त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावरही होणार आहे. बाजारात धान्य आणि डाळींची आवक कमी झाल्यास आगामी काळात गहू व हरभरा डाळीचे दर गगनाला भिडण्याची भीती व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.













Leave a Reply