माहुर प्रतिनिधी – रुपेश मोरे
माहुर तालुक्यात वन्यजीवांचा वावर दिवसेंदिवस वाढत चालला असून, आता बिबट्याने थेट पाळीव प्राण्यांना लक्ष्य केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र दहशत पसरली आहे. तालुक्यातील वाई बाजार येथील शेतकरी शंकर सोनुले यांच्या शेतात (सर्वे नंबर १७) बिबट्याने एका लहान वासराची शिकार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाई बाजार शिवारातील सर्वे नंबर १७ मधील शेतकरी शंकर सोनुले यांच्या शेतात नेहमीप्रमाणे जनावरे बांधलेली होती. दरम्यान, रात्रीच्या किंवा पहाटेच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक गोठ्याकडे धाव घेत वासरावर हल्ला केला. या हल्ल्यात वासराचा जागीच मृत्यू झाला. सकाळी शेतकरी वस्तीवर गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला, ज्यामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला असून कुटुंबात शोककळा पसरली आहे.माहुर परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्या आणि इतर वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, आता थेट पाळीव जनावरांवर हल्ले सुरू झाल्यामुळे शेतकरी व शेतमजूर धास्तावले आहेत. दिवसाढवळ्या किंवा रात्री शेतात काम कसे करायचे, असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. महिला आणि शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
सर्वे नंबर १७ मधील घटना; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण, वनविभागाने तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी.
या घटनेची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वनविभागाने तातडीने घटनास्थळी येऊन पंचनामा करावा, तसेच या नरभक्षक किंवा हिंस्र बिबट्याला जेरबंद करण्यासाठी त्वरित पिंजरा लावून कडेकोट बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.













Leave a Reply