माहूर (प्रतिनिधी) :- रुपेश मोरे
माहूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आणि किनवट-माहूर राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या वाई बाजार गावात बससेवा पुन्हा सुरू करण्यासाठी राजकीय नेते आक्रमक झाले आहेत. मात्र, गावातील बस स्थानक परिसरातील वाढलेले अतिक्रमण आणि मुजोर रिक्षाचालकांच्या मुजोरीमुळे लालपरीसह तेलंगणा राज्याच्या बसेसलाही गावात प्रवेश करणे कठीण झाले आहे. परिणामी, मागील अनेक वर्षांपासून खंडित असलेली बससेवा पूर्ववत होण्यात मोठा अडथळा निर्माण झाला असून, याचा नाहक त्रास दैनंदिन प्रवाशांना सहन करावा लागत आहे.वाई बाजार गावातील ग्रामस्थांची होत असलेली पायपीट लक्षात घेता, शिवसेना (शिंदे गट) युवा नेते पिंटू पाटील वायफनीकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) नांदेड जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रमेश गावंडे यांनी काही दिवसांपूर्वीच नांदेडच्या विभागीय वाहतूक नियंत्रकांना लेखी निवेदन दिले होते. माहूर-किनवट महामार्गावरून जाणाऱ्या सर्व बसेस वाई बाजार गावामध्ये आणाव्यात, अशी ठाम मागणी त्यांनी केली होती. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही मागणी अद्याप कागदावरच असल्याचे चित्र आहे.स्थानकावर असलेले अनधिकृत अतिक्रमण आणि बेशिस्त रिक्षाचालकांमुळे एसटी महामंडळ आणि तेलंगणा स्टेट्स बसच्या चालकांना गाडी वळवण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही. बस लांब आणि मोठी असल्याने ती वळवताना चालकांच्या जीवाला घाम फुटतो. एका तेलंगणा बसच्या चालकाने आपली अडचण स्पष्ट करत थेट गावातील परिस्थितीचे फोटो आणि व्हिडिओ आमच्या प्रतिनिधीला पाठवले आहेत. “आम्ही बस गावात आणायला तयार आहोत, पण आधी प्रशासनाने स्थानकावरील अतिक्रमण आणि मुजोर रिक्षाचालकांची रिक्षा काढून आम्हाला फिरवण्यासाठी मोकळी जागा करून द्यावी,” अशी आर्त मागणी बस चालकांकडून केली जात आहे.मुख्य रस्त्यावरील फाट्यापासून गावात पायी ये-जा करताना वृद्ध, शाळकरी मुले आणि महिलांचे हाल होत आहेत. नेत्यांच्या पाठपुराव्यानंतरही प्रशासनाने तात्काळ अतिक्रमण हटवून बससेवा सुरू करावी अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे.आता यावर प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.













Leave a Reply